.
“कोणालाही आणा, रस्ता देणार नाही!” वाकीत रस्ता अडवून शेतकऱ्याला धमक्या; जामखेड तहसीलदारांकडे धाव ; कारवाईची मागणी
जामखेड (प्रतिनिधी): १३ऑक्टोबर २०२६
जामखेड तालुक्यातील खर्डा हद्दीतील वाकी येथील एका शेतकऱ्याचा शेतात आणि घराकडे जाणारा जुना पारंपरिक रस्ता बेकायदेशीरपणे अडवून त्यांना धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्रस्त शेतकरी नवनाथ केशव धायगुडे यांनी जामखेडचे . तहसीलदार यांच्याकडे लेखी अर्ज सादर करून रस्ता मोकळा करण्याची आणि अडवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची
निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार नवनाथ केशव धायगुडे (रा. वाकी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांची वाकी येथील गट क्रमांक ८४ मध्ये शेतजमीन व घर आहे. सदर शेतात आणि घराकडे ये-जा करण्यासाठी पूर्वीपासून (कायम जुना) रस्ता अस्तित्वात आहे.
हा रस्ता ज्या जमिनीतून जातो, तेथील स्थानिक नागरिक १) ज्योतीराम दत्तात्रय खताळ, २) अर्जुन बाळू खताळ, आणि ३) योगेश आनंद जगताप यांनी सदर रस्ता बेकायदेशीरपणे अडवला असल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे.
अर्जात नमूद केल्यानुसार, रस्ता बंद केल्यामुळे शेतात जाणे-येणे पूर्णपणे थांबले आहे. याशिवाय संबंधित व्यक्तींकडून अर्जदारास मानसिक त्रास दिला जात असून वारंवार धमक्या दिल्या जात आहेत. “तुम्ही कोणालाही घेऊन या, आम्ही हा रस्ता देणार नाही” अशा प्रकारची अरेरावीची भाषा वापरून त्यांना रोखले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
रस्ता अडविल्यामुळे शेतातील दैनंदिन कामे खोळंबली असून पिकांची मशागत व देखभाल करणे कठीण झाले आहे. या अडूनमुठपणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून अर्जदाराला आर्थिक व मानसिक फटका सहन करावा लागत आहे.
या प्रकरणी महसूल आणि पोलीस प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करावी आणि अडवलेला रस्ता तात्काळ मोकळा करून देऊन न्याय द्यावा, अशी आग्रही मागणी अर्जदाराने केली आहे.
